*श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य*

26

*श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य*

श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, मध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्राचा जन्म झाला. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. मध्यान्हकाळी, कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात. भक्तमंडळी त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् ‘मर्यादापुरुषोत्तम’, आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श पति, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रु असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण, असे विचारताच डोळ्यांसमोर नाव येते ते म्हणजे ‘श्रीराम’ ! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात. श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य सनातन संस्थेच्या या लेखातून जाणून घेऊया !’

*श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य*

सर्वार्थाने आदर्श श्रीराम

*1. आदर्श पुत्र* : रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने ‘दुःख करू नका’ असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला 14 वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर रामाने नमस्कार केला व तो पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलला.

*2. आदर्श बंधू* : अजूनही आदर्श अशा बंधूप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

*3. आदर्श पती* : श्रीराम एकपत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असतांना दुसरी पत्नी न करता त्याने सीतेची प्रतिकृती स्वतःशेजारी बसविली.

*4. आदर्श मित्र* : रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात मदत केली.

*5. आदर्श राजा*

अ. गुरुसेवा म्हणून राज्यकारभार करणारा : ‘प्रभू श्रीरामचंद्राने वनवासाहून परतल्यानंतर राज्याभिषेक झाल्यावर आपले सर्व राज्य श्रीगुरु वसिष्ठांच्या चरणी अर्पण केल्याचा उल्लेख आढळतो; कारण ‘या समुद्रवलयांकित पृथ्वीच्या राज्यशासनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच पोहोचतो’, अशी श्रीरामाची धारणा होती. नंतर श्रीरामाने श्री वसिष्ठांची आज्ञा म्हणून, गुरुसेवा म्हणून 11 सहस्र वर्षे राज्यकारभार केला. त्यामुळे रामराज्य अत्यंत समृद्ध होते व त्या काळात सत्ययुग नांदत होते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

आ.राजधर्माचे पालन करण्यात तत्पर : प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. याविषयी कालीदासाने ‘कौलिनभीतेन गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः ।’ (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.) असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.

6. आदर्श शत्रू : रावणाच्या मृत्यूनंतर अग्नीसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण याने नकार दिला, तेव्हा रामाने त्याला सांगितले, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

7. धर्मपालक : श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.

‘श्रीरामाने प्रजेलाही धर्म शिकविला. त्याची शिकवणूक आचरणात आणण्याने मानवाची वृत्ती सत्त्वप्रधान राहिली व त्यामुळे समष्टी पुण्य निर्माण झाले. त्यामुळे निसर्गाचे वातावरण मानवी जीवनाला सुखावह झाले. तसेच निवृत्तीमार्गीय आणि प्रवृत्तीमार्गीय यांचा संबंधही न तुटल्यामुळे त्याची परिणती प्रत्येक जणच सुखी होण्यात झाली. म्हणूनच रामराज्यातील जीवन आदर्श मानले गेले आहे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

8. एकवचनी : श्रीराम एकवचनी होता. त्याने एकदा काही म्हटले की, ते सत्यच असायचे. श्रीराम हा ‘एकवचनी’ आहे. याचा अर्थ असा की, श्रीरामाशी एकरूप होणे, म्हणजे तीनकडून (अनेकाकडून)  दोघांच्या, म्हणजे गुरु व शिष्य या दोघांच्या नात्यातून

एकाकडे, म्हणजे श्रीरामाकडे जाणे. अनेकातून एकाकडे व एकातून शून्याकडे जाणे, अशी अध्यात्मात प्रगती असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार कृष्ण होय.

9. एकबाणी : श्रीरामाचा एकच बाण लक्ष्य वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे.

10. अती-उदार : सुग्रीवाने रामाला विचारले, ‘‘बिभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. (युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते.) आता रावण शरण आला, तर काय करणार ?’’ त्यावर राम म्हणाला, ‘‘त्याला अयोध्या देईन. आम्ही सर्व भाऊ जंगलात रहायला जाऊ.’’

11. सदैव स्थितप्रज्ञ असलेला : स्थितप्रज्ञता हे उच्च आध्यात्मिक पातळीचे लक्षण आहे. श्रीरामाची स्थितप्रज्ञावस्था पुढील श्‍लोकावरून लक्षात येते.

प्रसन्नता न गतानभिषेकतः तथा न मम्ले वनवासदुःखतः । मुखाम्बुजश्री रघुनंदनस्य या सदास्तु मे मंजुल मंजुलमंगलप्रदा ॥

अर्थ : राज्याभिषेकाची वार्ता ऐकून ज्याच्यावर प्रसन्नता उमटली नाही आणि वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले असताही ज्याच्यावर विषण्णता पसरली नाही, ती श्रीरामाची मुखकांती आमचे नित्यमंगल करो.

गीतेच्या परिभाषेत यालाच ‘न उल्हासे, न संतापे । त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥’ असे म्हटले आहे.

12. मानवत्व : राम मानवाप्रमाणे सुख-दुःख दाखवितो (व्यक्त करतो) व म्हणून तो आपल्याला इतर देवांपेक्षा अधिक जवळचा वाटतो, उदा. सीताहरण झाल्यावर राम अत्यंत शोकाकुल झाला होता; मात्र अशा प्रसंगीही रामाचे ईश्‍वरत्व शाबूत असायचे, हे शिव(शंकर)-पार्वतीच्या पुढील संवादावरून लक्षात येईल.

पार्वती : आपण ज्याचे नामस्मरण करता, तो सामान्य माणसाप्रमाणे पत्नीसाठी किती शोक करीत आहे, ते पहा.

शंकर : तो शोक वरवरचा आहे. त्याने मनुष्यदेह धारण केल्यामुळे त्याला त्याप्रमाणे वागावे लागत आहे.

पार्वती : राम झाडाला आलिंगन देत फिरत आहे, म्हणजे तो सीतेसाठी खरंच वेडा झाला आहे.

शंकर : मी म्हणतो ते खरं कि खोटं, याचा तूच अनुभव घे. तू सीतेचे रूप घेऊन त्याला भेट. मग राम कसा वागतो, ते पहा. त्याप्रमाणे पार्वती गेली; पण श्रीरामाने तिला पाहिल्याबरोबर नमस्कार केला व म्हणाला, ‘‘तुला मी ओळखले. तू आदिमाया आहेस.’’ हे ऐकून श्रीरामाचा शोक वरवरचा आहे, याची पार्वतीला खात्री पटली.

13. रामराज्य

अ. त्रेतायुगात एकटा श्रीराम सात्त्विक होता असे नाही, तर प्रजाही सात्त्विक होती; म्हणूनच रामराज्यामध्ये एकही तक्रार श्रीरामाच्या दरबारात आली नव्हती.

आ. खरे रामराज्य (भावार्थ) : पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धी व अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय.

संदर्भ – सनातन संस्थेचे प्रकाशन ‘श्रीराम’ व ‘विष्णु व विष्णूची रूपे’

 

*संकलन*- श्रीमती विभा चौधरी

*संपर्क*-7620831487