*अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन*

31

*अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाकरिता नोंदणी करण्याचे आवाहन*

 

गडचिरोली, दि. 01 ऑक्टोबर (जि.मा.का.) :

राज्यातील युवकांना रोजगारक्षम बनवून उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 75 हजार उमेदवारांना आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 08 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. त्यानंतर 09 ऑक्टोबरपासून राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच 141 तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2 हजार 506 प्रशिक्षण तुकड्या सुरू होणार आहेत. यात महिलांसाठी विशेषतः 364 बॅचेस कार्यान्वित होणार आहेत.

 

*अभ्यासक्रमाचे स्वरूप*

 

या योजनेंतर्गत तरुणांना जागतिक स्तरावर मागणी असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामध्ये ॲडीटीव्ह मॅन्युफॅक्चरींग, एरोस्पेस स्ट्रक्चर फिटर, इंटरनेट ऑफ थिंग्स, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ड्रोन तंत्रज्ञान, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, सायबर सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल रिपेअर टेक्निशियन आदी अत्याधुनिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

 

*शुल्क आणि नोंदणी*

 

या अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी दरमहा 1 हजार ते 5 हजार रुपये इतके नाममात्र शुल्क निश्चित करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व इच्छुक आणि बेरोजगार उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.