एटापल्ली शहरात १२ फेब्रुवारीला सफाई काम बंद-आयटक
एटापल्ली, :
सेंट्रल ट्रेड युनियन व संयुक्त किसान मोर्चा यांच्या संयुक्त आह्वानावरून केंद्र सरकारने लागू केलेले कामगारविरोधी चार लेबर कोड रद्द करण्याच्या मागणीसाठी दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी आम हडताल आयोजित करण्यात आली आहे. या आम हडतालला आयटक अहेरी विधानसभा शाखेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आयटकच्या वतीने नगरपंचायत एटापल्लीचे मा. मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या आदेशानुसार कॉ. विशाल पुज्जलवार यांनी दिले, अशी माहिती देण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारने लागू केलेले चार लेबर कोड हे कामगारांच्या नोकरीची सुरक्षितता, वेतन, सामाजिक सुरक्षा तसेच संघटन स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत. या कायद्यांचा सर्वाधिक फटका सफाई कामगार, कंत्राटी कर्मचारी व असंघटित क्षेत्रातील कामगारांना बसत आहे. त्यामुळे या कामगारविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ होत असलेल्या देशव्यापी आम हडतालला आयटकने समर्थन दिले आहे.
या अनुषंगाने, नगरपंचायत एटापल्ली अंतर्गत कार्यरत असलेले सफाई कामगार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आम हडतालला समर्थन म्हणून पूर्ण दिवस सफाई काम बंद ठेवणार असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. हा निर्णय लोकशाही मार्गाने व कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी घेण्यात आल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.









