Home गडचिरोली जिल्हा नगर पालिका प्रशासन गडचिरोलीतर्फे क्रीडा- संस्कृतीचा महाउत्सव; तीन दिवसीय जिल्हास्तरीय महोत्सवाला...

जिल्हा नगर पालिका प्रशासन गडचिरोलीतर्फे क्रीडा- संस्कृतीचा महाउत्सव; तीन दिवसीय जिल्हास्तरीय महोत्सवाला भव्य प्रारंभ

36

जिल्हा नगर पालिका प्रशासन गडचिरोलीतर्फे क्रीडा- संस्कृतीचा महाउत्सव; तीन दिवसीय जिल्हास्तरीय महोत्सवाला भव्य प्रारंभ

 

गडचिरोलीत क्रीडा संस्कृतीचा संगम; नगराध्यक्ष अॅड प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते शुभारंभ

 

23/02/2026

गडचिरोली, : जिल्हा नगर पालिका प्रशासन, गडचिरोली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचा शहरातील क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शुभारंभ करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर उपस्थित होत्या. उद्घाटन प्रसंगी नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदूरकर यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

उद्घाटन सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रीडा ध्वजारोहणाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत क्रीडास्पर्धांचा प्रारंभ केला. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि विभागांतील स्पर्धक मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत.

 

नगराध्यक्ष अॅड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी आपल्या मनोगतात क्रीडा आणि संस्कृती हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे नमूद केले. “स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे असले तरी सहभागातून मिळणारा अनुभव आणि शिस्त हीच खरी कमाई असते,” असे त्यांनी सांगितले. युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेत जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदूरकर यांनीही महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्याबद्दल कौतुक केले.

 

क्रीडांगणावर रंगलेल्या विविध स्पर्धांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवाला रंगत आली आहे.

 

जिल्हा नगर परिषद प्रशासनाच्या या उपक्रमामुळे क्रीडा व संस्कृतीला चालना मिळणार असून युवकांमध्ये नवी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Don`t copy text!