Home गडचिरोली *शीवणी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा...

*शीवणी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा उत्साहात संपन्न*

66

*शीवणी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा उत्साहात संपन्न*

 

गडचिरोली, दि. २४ फेब्रुवारी : ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, गडचिरोली यांच्या वतीने मौजा शीवणी, ता. गडचिरोली येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा जल अर्पण सोहळा आज उत्साहात पार पडला . गावकऱ्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीने आयोजित या सोहळ्यामुळे शीवणी गावाला घराघरांत शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उददरवार, उपविभागीय अभियंता नितीन पाटील, गट विकास अधिकारी अनिकेत पाटील यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 

सोहळ्याची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शीवणी व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रभातफेरीने झाली . विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन आणि स्वच्छ पाण्याच्या महत्त्वाविषयी घोषणाबाजी करत गावात जनजागृती केली. नव्याने उपलब्ध झालेल्या नळपाण्याचे मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, तर युवक व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले .

 

यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली . विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले आणि सर्व उपस्थितांनी जलप्रतिज्ञा घेत जलसंवर्धनाचा संदेश दिला. ग्रामस्थ महिलांनी आणलेल्या जलकलशाचे पूजन गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जल अर्पण सोहळ्याची सांगता करण्यात आली .

 

कार्यक्रमादरम्यान उपविभागीय अभियंता नितीन पाटील यांनी योजनेची सविस्तर तांत्रिक माहिती दिली . प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून स्वच्छ पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असल्याचे अधोरेखित करत जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागात जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत पदाधिकारी व महिलांनीही मनोगत व्यक्त करून शासनाचे आभार मानले .

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अरुणा गोहणे यांनी केले, तर कनिष्ठ अभियंता निर्भय करेवार यांनी आभार प्रदर्शन केले . ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, जिल्हा परिषद शाळा शीवणी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला .

Don`t copy text!