गडचिरोली, दि.०२, जिमाका :- कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर, 2021 रोजी प्रसारीत केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in वा https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे.
अर्जदाराने, सदरील लिंकवर संबंधित आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हास्तरीय स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी आवाहन करण्यात येते की, कोविड-19 साथरोगामुळे मृत्यु प्रकरणी संबंधितांनी वरील लिंक वर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावे. याकरिता कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही याची नोंद घ्यावी.