नगरपंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

83

गडचिरोली, (जिमाका) दि.07:- राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 24 नोव्हेंबर 2021, रोजीच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हयातील नगर पंचायत, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कुरखेडा, व कोरची या 9 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम-2021 जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वरील निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी दिनांक 01.12.2021 ते 07.12.2021 पर्यंत ठरवून देण्यात आले आहे.

तथापि, गडचिरोली जिल्ह्यातील काही नगरपंचायतींमध्ये विद्युत प्रवाह व इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने उक्त ठिकाणी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता आले नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 07.12.2021 रोजीच्या पत्रातील निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दिनांक 08.12.2021 (बुधवार) वेळ दुपारी 3.00 वाजता पर्यंत नामनिर्देशनपत्र ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात यावेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 09.12.2021 (गुरुवार) सकाळी 11.00 वाजल्यापासून निश्चित करण्यात येत आहे. व यापुढील उर्वरित निवडणुकीचे टप्पे राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 24.11.2021 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.