Home गडचिरोली *विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घेतलेली मुलाखत*

*विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घेतलेली मुलाखत*

8

*विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला घेतलेली मुलाखत*

 

*परिचय :* शैक्षणिक, सामाजिक, ओबीसी हक्क, विदर्भ विकास आणि विविध जनआंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग असलेले विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे हे विदर्भातील एक परिचित व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी ही विशेष मुलाखत.

 

 

प्रश्न १ : आपल्या जडणघडणीबद्दल आणि बालपणाबद्दल सांगा.

 

उत्तर : मी ग्रामीण भागातून आलेल्या एका संघर्षशील परिवारातून पुढे आलो. लहानपणापासूनच शिक्षण, सामाजिक प्रश्न, राजकारण आणि सर्वसामान्य माणसांचे जीवन यांचे जवळून निरीक्षण केले. कुटुंबातील संस्कार, शिक्षणाविषयीची आस्था आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा यामुळेच पुढील वाटचाल घडत गेली.

 

 

प्रश्न २ : शिक्षण क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा कशी मिळाली?

 

उत्तर : आमचे कुटुंब मागील एका पिढीपासून शिक्षण क्षेत्रात काम करत आले आहे. एक मोठा त्याग आम्ही शिक्षणाचे व्रत सांभाळताना केला आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, असा आमच्या कुटुंबाचा ठाम विश्वास आहे. शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक म्हणून काम करताना अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याची संधी मिळाली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना सक्षम बनविणे हेच आमचे ध्येय राहिले आहे.

 

 

प्रश्न ३ : सामाजिक कार्याकडे आपला प्रवास कसा झाला?

 

उत्तर : शिक्षण क्षेत्रात काम करत असताना समाजातील अनेक समस्या जवळून पाहिल्या. भौतिक गरजा, रोजगार, आरक्षण, शिक्षण, पर्यावरण, शेतकरी प्रश्न, सामाजिक असमतोल, सामाजिक न्याय, महिला उत्थान, यासारख्या विषयांवर काम करण्याची गरज जाणवली. त्यामुळे सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

 

 

प्रश्न ४ : ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत आपण सातत्याने भूमिका मांडता. यामागील भूमिका काय आहे?

 

उत्तर : भारतीय समाजातील मोठा घटक असलेल्या ओबीसी समाजाला घटनेच्या ३४०व्या कलमानुसार संविधानिक हक्क आणि न्याय मिळणे आवश्यक आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना, शिक्षण व रोजगारातील प्रतिनिधित्व, राजकीय आरक्षण आणि सामाजिक सक्षमीकरण यासाठी सातत्याने आवाज उठविणे ही काळाची गरज आहे.

 

 

प्रश्न ५ : आपल्या ओबीसी चळवळीचे फलित म्हणून विद्यमान परिस्थितीत शासन व ओबीसी समाज यांच्यादरम्यान ओबीसींचे प्रश्न व त्यांचे निराकरण यात कितपत यश आले असे वाटते?

 

उत्तर : केंद्र व राज्य सरकार ओबीसी समाजाबाबत सकारात्मक आहेत. २०१४ पासून राज्य सरकारने ओबीसी समाजासाठी ५८ शासन निर्णय काढले. अजूनही अनेक मागण्या प्रस्तावित आहेत. राज्याप्रमाणे केंद्रातही ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, नॉन क्रीमिलेयरची मर्यादा वाढविण्यात यावी, ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, आदी आणखी काही मागण्या केंद्र व राज्य सरकार कडून मंजूर करुन घ्यायच्या आहेत.

 

 

प्रश्न ६ : ओबीसींची जातनिहाय जनगणना होईल का? काय वाटते?

 

उत्तर : स्वातंत्र्यानंतर २०११ च्या जनगणनेपर्यंत त्या वेळच्या केंद्र सरकारांनी ओबीसींची जातिनिहाय जनगणना केली नाही. यावेळी तरी केंद्र शासनाने ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, अशी सर्व ओबीसी संघटनांची आग्रही मागणी आहे. त्यानुसार मान. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व मान. गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणनेसाठी ओबीसी कॉलम ठेवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. परंतु जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातच ओबीसींचा कॉलम ठेवला असता तर ओबीसी समाज आश्वस्त झाला असता.

 

 

प्रश्न ७ : मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाकडे आपण कसे बघता?

 

उत्तर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील मागण्यांमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना डॉ. जीवतोडे म्हणाले की, वारंवार उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकार, मराठा व ओबीसी समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे.

 

प्रश्न : ८ : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत ओबीसी नेते म्हणून काय वाटते?

 

उत्तर : महाराष्ट्र राज्यातील उपलब्ध नोंदींनुसार, राज्यातील स्वातंत्रोत्तर काळातील आजपर्यंतच्या उपलब्ध एकूण ५८ लाख ७७ हजार ९९३ कुणबी नोंदींनुसार अमरावती विभागात सर्वाधिक २६ लाख १५ हजार २२७ कुणबी नोंदी आढळल्या असून नागपूर विभागात ९ लाख ४९ हजार २२०, नाशिक विभागात ७ लाख ९१ हजार ४०, कोकण विभागात ७ लाख ५३ हजार ५६ आणि पुणे विभागात ६ लाख ७ हजार ६१९ नोंदी आढळल्या आहेत. मराठवाडा विभागात मात्र केवळ ३२ हजार ९१ नोंदी आढळल्याचे त्यांनी नमूद केले.

 

जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू झाले असले तरी त्या जिल्ह्यात केवळ ३ हजार ३१८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. जिल्हानिहाय आकडेवारीत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे ७ लाख ९० हजार नोंदी आढळल्या आहेत.

 

विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ३५ लाख ५७ हजार ४३५ कुणबी नोंदी आढळल्या असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात मिळून सुमारे २२ लाख ४२ हजार ५६२ नोंदी सापडल्या आहेत. मराठवाड्यात आढळलेल्या ३२ हजार ९१ नोंदींपैकी २३ हजार २९० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे सरसकट मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होईल, हा दावा फोल आहे.

 

 

प्रश्न ९ : आपण ओबीसीतील सर्वजातीय विदर्भस्तरीय जातपंचायत व विदर्भस्तरीय ओबीसी महिला परिषद घेतली होती? त्याबाबत सांगा.

 

उत्तर : मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण, याचा आम्ही कडक विरोध केला होता. मराठा आंदोलक जरांगे यांचे उपोषण सुरु होते, त्या पार्श्वभूमीवर ओबीसीतील सर्व जात प्रमुखांची विदर्भस्तरीय जातपंचायत घेतली होती, त्यातून आम्ही विरोधाचा एल्गार पुकारला होता. त्यानंतर मागील वर्षी ११ जून ला विदर्भस्तरीय ओबीसी महिला परिषद घेतली होती. या परिषदेत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधिक महिलांना एकत्र करुन ओबीसी समाजासाठी आदर्श आचारसंहिता तयार करण्यात आली होती. या आचारसंहितेचे पालन ओबीसी समाजाने केल्यास समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्थान करुन घेता येईल.

 

 

प्रश्न १० : राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये आपली भूमिका काय आहे?

 

उत्तर : राष्ट्रीय समन्वयक म्हणून विविध राज्यांतील संघटनांना एकत्र आणणे, ओबीसी समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे आणि संविधानिक हक्कांसाठी संघटित लढा उभारणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशभरात ओबीसी महाआधिवेशन भरविणे, मोर्चे, आंदोलन, निवेदन या लोकशाहीच्या आयुधांच्या माध्यमातून ओबीसी चळवळ पुढे घेऊन जाणे. ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे.

 

 

प्रश्न ११ : विदर्भाच्या विकासाबाबत आपली भूमिका काय आहे?

 

उत्तर : विदर्भ हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध प्रदेश असूनही अनेक बाबतीत मागे राहिला आहे. सिंचन, उद्योग, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा विकास झाला पाहिजे. स्थानिक संसाधनांवर आधारित विकासाचे मॉडेल राबविण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्र फडणवीस विदर्भ विकासासाठी महत्वाचे पाऊल उचलत आहेत. विदर्भात मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. विदर्भातील एकेकाळच्या ड्राय एमआयडीसी गजबजलेल्या आहेत. समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, गडचिरोली स्टील हब, नागपूर मिहान हे सर्व विदर्भाचा विकास करणारे प्रकल्प आहेत.

 

 

प्रश्न १२ : आजच्या युवकांना आपण काय संदेश द्याल?

 

उत्तर : युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता आत्म-कौशल्य विकसित करावे. सामाजिक भान ठेवले पाहिजे. संविधान, इतिहास आणि समाजव्यवस्था यांचा अभ्यास करावा. वैज्ञानिक दृष्टिकोन, संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्याद्वारे देश व समाजाच्या विकासात योगदान द्यावे.

 

 

प्रश्न १३ : आपल्या कार्यातील सर्वात मोठे समाधान काय आहे?

 

उत्तर : एखाद्या विद्यार्थ्याला यश मिळणे, एखाद्या सामाजिक प्रश्नावर सकारात्मक बदल घडणे किंवा वंचित घटकांच्या हक्कांसाठी केलेल्या संघर्षाला यश मिळणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.

 

 

प्रश्न १४ : भविष्यातील आपले ध्येय काय आहे?

 

उत्तर : शिक्षण, सामाजिक न्याय, ओबीसी हक्क, विदर्भ विकास आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी अधिक व्यापक जनजागृती करणे हेच माझे पुढील ध्येय आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राहील.

 

 

समारोप :

शिक्षण, समाजकारण, ओबीसी हक्क आणि विदर्भाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले डॉ. अशोक जीवतोडे यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. संघर्ष, अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

Don`t copy text!