राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 24.11.2021 रोजीच्या पत्रानुसार जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्यावर तात्काळ स्थगित

81

गडचिरोली, (जिमाका) दि.07 :- महाराष्ट्र राज्य शासनाने प्रख्यापित केलेल्या सन 2021 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6 ला मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे रिट याचिका क्रमांक 12607/2021 (श्री.पद्माकर ओंकार सोनावणे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर ) ला आवाहन देण्यात आले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सदर प्रकरणात न्यायालयाने दिनांक 18 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार आयोगातर्फे करण्यात येणारी सर्व कार्यवाही ही उक्त नमूद याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहील, असे आदेशित केले आहे. त्यास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
तथापि, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट याचिका क्रमांक 11744/2021 (राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर) तसेच इतर दोन याचिकांद्वारे आवाहन देण्यात आले होते. या याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने दिनांक 22 ऑक्टोंबर 2021 रोजी दिलेल्या अंतरीम आदेशाविरुद्ध संबंधित याचिकाकर्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.19756/2021 अन्वये अपील दाखल केले होते. सदर अपीलासह रिट पिटीशन क्र.1316/2021 मध्ये दिनांक 06 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या आदेशानुसार नागरीकाचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणूका स्थगित ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे. तसेच या निवडणूकांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार पुढे सुरु ठेवून पूर्ण करण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले आहे.
त्यास अनुसरुन राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 07.12.2021 रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 24.11.2021 रोजीच्या पत्रानुसार जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमातील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्या टप्यावर तात्काळ स्थगित करण्यात येत आहे तरी सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे